महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे हे 5 तासांपासून मालवणी पोलीस ठाण्यात हजर आहेत. दिशा सालियनप्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी ते पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. तब्बल 5 तासांपासून जबाब नोंदविण्यात येत असल्याने पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत दिशा सालियान आत्महत्येप्रकरणी वक्तव्य केलं होतं. तर, नितेश राणे हेही ट्विटरवरुन सातत्याने दिशा सालियन प्रकरणावर भाष्य करत आहेत. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात दिशाच्या आई-वडिलांनी मालवणी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर एफआयर दाखल झाला होता. याप्रकरणात, मालवणी पोलिसांनी दहा मार्चपर्यंत या प्रकरणात नारायण राणे यांना अटक करू नये असे आदेश दिंडोशी न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता खुद्द नारायण राणे आणि नितेश राणे आज मालवणी पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत. पोलिसांसमोर आपली बाजू मांडत जबाब नोंदविण्यासाठी ते पोलीस ठाण्यात आले आहेत. नारायण राणे आणि नितेश राणे 5 तासांपासून मालवणी पोलीस ठाण्यात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. तर, 5 तासांपासून राणेंची चौकशी होत असल्याने कोणतीही पासपोर्ट पडताळणी आणि तक्रार घेण्यात आली नाही. त्यामुळे, नागरिकांनीही पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.