महागाई : खाद्यतेलाची ८० टक्के आयात थांबली; तेलाच्या दरांत २८ ते ३५ टक्के वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ८ मार्च । युक्रेन-रशिया युद्ध व त्याचवेळी इंडोनेशिया सरकारच्या आठमुठ्या धोरणाचा देशाच्या खाद्यतेल आयातीला जबर फटका बसला आहे. भारत जगातील सर्वाधिक खाद्यतेल आयात करणारा देश असून खाद्यतेलाच्या एकूण आयातीपैकी तब्बल ८० टक्के आयात रखडली आहे. त्यामुळे तेलाच्या दरांत २८ ते ३५ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.

भारत हा खाद्यतेलाची सर्वाधिक मागणी असलेला देश आहे. पण मागणीच्या जेमतेम १५ टक्के तेल उत्पादन भारतात होते. त्यामुळेच भारताला दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते. एकूण आयातीत ६० टक्के पामतेल किंवा तेलबिया इंडोनेशियाहून तर १८ ते २२ टक्के सूर्यफूल तेल किंवा तेलबियांची आयात युक्रेन आणि रशियाहून होते. पण सध्या या दोन्ही आयातीचे गणित बिघडले आहे.

खाद्यतेल क्षेत्रातील आयातदारांनुसार, युक्रेन व रशियातून अखेरची आयात १५ फेब्रुवारीला झाली. त्यानंतर तेथून मुंबईत किंवा भारताच्या कुठल्याच बंदरावर तेलाची आयात झालेली नाही. इंडोनेशियासंबंधी तेल आयातीचा वाद जानेवारीपासूनच सुरू असून तेव्हापासूनच आयात कमी झाली होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अत्यल्प आयात झाली. आता युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अस्थिरतेचा फायदा घेण्यासाठी त्यांनी भारताकडे होणारी पामतेल निर्यात पूर्णपणे थांबवली आहे. अशाप्रकारे एकूण मागणीच्या ८० टक्के खाद्यतेल आयात ठप्प झाली आहे. त्याचाच भारतीय खाद्यतेल बाजाराला फटका बसत आहे.

या सर्व स्थितीमुळे देशांतर्गत खाद्यतेल आता चांगलेच महाग होत आहे. दोन आठवडे आधी १३० ते १३५ रुपये प्रति लीटर असलेले पामतेल आता १४५ रुपयांच्या घरात गेले आहे. १४५ रुपयांचे सूर्यफूल तेल १५० ते १५५ रुपये, १४५-१४८ रुपयांचे सोयाबीन तेल १५५-१६० रुपयांवर तर शेंगदाणा तेल २०० रुपयांवर आणि एरव्ही अत्यल्प मागणी असलेले राइसब्रान तेलदेखील आता १५० रुपये प्रति लिटरवर गेले आहे.

दरवाढ झाल्याने ग्राहकांकडून खरेदी वाढली आहे. परिणामी अनेक सुपर मार्केट, मॉल्समध्ये एकावेळी कमाल पाच लिटर तेल खरेदी करण्याचे निर्बंध आणले आहेत. तर काही किराणा दुकानदारांकडील सूर्यफूल तेलाचा साठा संपला आहे. त्यामुळे ग्राहक राइसब्रान तेलाकडे वळले आहेत. अनेक ग्राहकांनी भविष्यातील दरवाढीचा विचार करत तेलाच्या पाच लीटर व १५ लीटर डब्यांच्या खरेदीला सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *