Weather Alert ! पुण्यासह या 16 जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता , येत्या काही तासात बरसणार सरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च । उत्तर भारतात उन्हाचा तडाखा वाढत (temperature rise) असताना मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांना अवकाळी पावसानं (Non Seasonal rainfall) झोडपलं आहे. मागील तीन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी गारपीट (hailstorm) देखील झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकं धोक्यात आली असून, पिकांचं नुकसान झालं तर राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

आजही राज्यात अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. आज कोकण, घाट परिसर, आणि लगतच्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही तासांत याठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने (IMD) आज पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.

पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत. दरम्यान अनेक ठिकाणी वेगवान वारे वाहणार असून वाऱ्यांचा 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगाम शेवटच्या टप्प्यात असून अनेक ठिकाणी पिकांची काढणी झाली आहे. पावसाळ्यात राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं आधीच खरीप हंगाम वाया गेलं आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाल्यानं राज्यातील शेतकरी धास्तावला आहे.

उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. पुढील चार दिवस राज्यात कोणाताही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही. चारही दिवस राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची शक्यता आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील किमान आणि कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *