महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च । जिंतूर आगारातील बसचालक मुजफ्फर खान जफर खान पठाण (४५) यांनी आर्थिक विवंचनेतून जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी परिसरातील एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. गेल्या दोन वर्षांत राज्यात ४२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून मुजफ्फर खान हे ४३ वे कर्मचारी ठरले आहेत.
संपात सहभागी असलेले मुजफ्फर खान यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. संपामुळे पगारही होत नव्हता. ते शुक्रवारी घराबाहेर पडल्यानंतर शनिवारी एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटी कर्मचारी आणि खान यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. या वेळी नातेवाइकांनी जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केले. सायंकाळपर्यंत तिढा सुटला नव्हता.