महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च । शुगर म्हणजेच मधुमेह (Diabetes) हा मुख्यत: धकाधकीच्या जीवनशैलीमुळं होणारा आजार मानला जातो. हा आजार पूर्वी वृद्धांना होत असे, मात्र गेल्या काही काळात तरुण वर्गही या आजाराला झपाट्याने बळी जात असल्याचे दिसून आलं आहे. मधुमेह हा एक असा आजार आहे जो शरीराच्या सर्व अवयवांना हळूहळू बाधित करत जातो. व्यक्तीचे शरीर एकप्रकारे आतून खराब होत जातं. मात्र, योग्य दिनचर्येचा अवलंब करून आणि आरोग्यदायी आहाराचे पालन करून रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवल्यास निरोगी व्यक्तीप्रमाणे आयुष्य (Diabetes Symptoms) जगता येते.
मधुमेह असेल तर शरीरातील काही बदल आणि काही लक्षणांमुळे ते सहज ओळखता येतं. cdc.gov च्या माहितीनुसार, जर तुम्हाला शरीरात मधुमेहाची काही लक्षणं जाणवली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मधुमेहाची लक्षणं
– रात्री वारंवार लघवी होणे.
– खूप तहान लागते.
– सतत वजन कमी होणे.
– कधीकधी खूप लवकर भूक लागते.
– धूसर दृष्टी.
– अचानक खूप थकल्यासारखे वाटणे.
– खूप कोरडी त्वचा.
– जखमा, जखमा बऱ्या व्हायला बराच वेळ लागतो.
– सहज संसर्ग होणं.
– हात-पाय सुन्न होणं.
टाइप 1 मधुमेहाची लक्षणं
टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांना मळमळ, उलट्या किंवा ओटीपोटात दुखणे ही लक्षणं देखील असू शकतात. ही लक्षणे काही आठवडे किंवा काही महिन्यांत वाढू शकतात आणि ती खूप गंभीर असू शकतात. टाईप 1 मधुमेहाची सुरुवात सामान्यतः बालपण, किशोरावस्था किंवा पौगंडावस्थेमध्ये होते. तशी ती कोणत्याही वयात होऊ शकते.
टाइप 2 मधुमेहाची लक्षणं
टाइप 2 मधुमेहाची लक्षणं दिसायला बरीच वर्षे लागतात. असेही बरेच लोक आहेत ज्यांना टाइप 2 मधुमेहाची कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. सामान्यतः टाईप 2 मधुमेह प्रौढत्वानंतरच होतो. हा प्रकार लहानपणापासूनही सुरू होऊ शकतो, परंतु त्याची लक्षणं सुरुवातीला ओळखणं कठीण असतं.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी वैद्यांचा सल्ला घ्या . )