महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च । केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे. जुहू येथील अधीश (Adhish Bungalow, Juhu) बंगल्याचं बांधकाम करताना राणे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगर पालिकेने ही नोटीस धाडली आहे. यापूर्वी मुंबई महानगर पालिकेच्या पथकाने राणेंच्या घरी जात पाहणी केली होती. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेने (BMC) थेट राणेंना १५ दिवसांत अनधिकृत बांधकाम काढा अन्यथा कारवाई करु अशी नोटीस दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या 9 अधिकाऱ्यांचं पथक २१ फेब्रुवारी रोजी राणेंच्या अधीश बंगल्यामध्ये गेलं होतं. याठिकाणी त्यांनी कागदपत्रांची पडताळणी, बंगल्याची पाहणी करत, नारायण राणेंशी चर्चा केली होती. महापालिकेच्या पथकासह फोटोग्राफर्स देखील अधीश बंगल्यात गेले होते. अनधिकृत कामांचे पुरावे गोळा करण्याचं काम या फोटोग्राफर्सने केलं होतं.
दरम्यान, नारायण राणे यांच्या जुहूमधील अधीश बंगल्यावर अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगरपालिकेने नारायण राणेंना नोटीस पाठवली होती. त्यानंतर नारायण राणेंनी आपण कोणत्याच नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं सांगितलं आहे.