महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) ही स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्या संघासोबत एक असं नाव जोडलं आहे ज्या खेळाडूने दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. तसेच तो माजी दिग्गज भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आवडत्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. शेन वॉटसन (Shane Watson) असं या खेळाडूचं नाव आहे. दिल्लीने ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएलमधला मोठा मॅच विनर शेन वॉटसन याची संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे आधीच सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अजित आगरकर आहे पण या फ्रँचायझीने शेन वॉटसनलाही आपल्या प्रशिक्षक संघात स्थान दिले आहे. शेन वॉटसन हे आयपीएलमधील मोठे नाव आहे, त्याने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जसह आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. शेन वॉटसन आरसीबीकडूनदेखील आयपीएल खेळला आहे आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा शेवट केला. वॉटसन 2020 मध्ये अखेरचा आयपीएल सामना खेळला आणि त्यानंतर त्याने क्रिकेटला अलविदा केला.
वॉटसनने आयपीएलमध्ये 145 सामन्यांमध्ये 3874 धावा केल्या आहेत. तसेच 92 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. वॉटसनचे हे आकडे त्याचा शानदार अनुभव दर्शवतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दांडग्या अनुभवामुळे वॉटसनचा दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये समावेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आहे. अजित आगरकर आणि शेन वॉटसन हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स आणि फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण अमरे आहेत.