महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील सत्ता भाजपने कायम राखली आहे. निवडणूक निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पण मुख्यमंत्रिपदावरुन गोवा भाजपमध्ये दोन गट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी गोव्यात बंड होणार का? याची चर्चा रंगली आहे. गोवा भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु झाल्यामुळे भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगलाय का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
गोव्यात सर्वात जास्त विधानसभेचे उमेदवार निवडून आणून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष झाला. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचा होणार यात शंका नाही. मात्र आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाचे उमेदवार विश्वजीत राणे यांनी शड्डू ठोकल्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.नुकतीच झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार निवडून आणत भाजप हा पक्ष सर्वात मोठा पक्ष झाला आहे. मात्र त्यांना एक उमेदवार कमी पडल्यामुळे ते बहुमताचा आकडा पार करु शकले नाहीत. याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न काही आमदार घेत असल्याचे समोर आले आहे.
मागील दोन दिवसांपासून गोव्यातील प्रमुख दैनिकांमध्ये विश्वजीत राणे यांच्या पत्नी दिव्या विश्वजीत राणे यांच्या विजयाच्या जाहिराती छापून येत आहेत. यामधे भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांचे फोटो छापून येत आहेत, मात्र भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रमोद सावंत यांचा फोटो नसल्यामुळे सर्वांनीच भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे याच जाहिरातीत महिला शक्तीचा उदय झाला आहे, अशा आशयाचा मजकूर देखील छापण्यात आला आहे. त्यामुळे गोव्याला महिला मुख्यमंत्री मिळणार का? याची चर्चा रंगली आहे.