महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । एकीकडे संपूर्ण जग कोरोना संसर्गासह जगण्यासाठी सरसावत आहे, तर तिकडे चीनमध्ये संसर्ग वेगाने पसरत आहे. ‘झीरो कोविड पॉलिसी’ वर सक्तीने अंमलबजावणी करूनही कोरोना अनियंत्रित आहे. २४ तासांत चीनमध्ये कोरोना काळातील सर्वाधिक ३६०२ रुग्ण आढळले आहेत. टेक्नॉलॉजी हब शेंझेन शहरातील पावणेदोन कोटी लोकांसह ११ शहरांत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे ८ कोटींहून अधिक लोक घरात कैद आहेत. शेंझेनमध्ये कोरोना निर्बंधांमुळे देशाचा निम्मा जीडीपी प्रभावित होऊ शकतो. याशिवाय इतर ठिकाणच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ब्लूमबर्गच्या मते या लॉकडाऊनचा ग्वांगडाँगच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होणे निश्चित आहे.
एएनझेडमधील ग्रेटर चायनाचे मुख्य अर्थतज्ज्ञ रेमंड येयुंग म्हणाले की, शांघाय व शेंजेंगमध्ये उत्पादनांसह पुरवठा विस्कळीत झाल्याने त्याचे थेट परिणाम जीडीपी वृद्धीवर होतील. ते म्हणाले, ७ दिवसांच्या लॉकडाऊनमुळेच चीनचा विकासदर निश्चित उद्दिष्टाच्या ०.५ टक्के कमी राहील.
उत्पादन क्षेत्राचा गड मानल्या जाणाऱ्या या राज्याचा जीडीपी सुमारे १५० लाख रुपये किंवा त्याचे योगदान ११% इतके आहे. हा भाग स्पेन आणि दक्षिण कोरियाच्या एकूण जीडीपीइतका आहे. २०२१ मध्ये चीनमधून झालेल्या एकूण निर्यातीपैकी ग्वांगडाँग प्रांताचा हिस्सा ७९५ अब्ज डॉलर(सुमारे ६०.९० लाख कोटी रु.) होता. हा चीनच्या एकूण शिपमेंटच्या २३% होता. शेंझेन शहरात लॉकडाऊन राहिला तर ते केवळ चीनच्या जीडीपीवर परिणाम करणार नाही तर जगातील अनेक देश यामुळे प्रभावित होतील. तिकडे, पूर्वाेत्तर जिलिन प्रांतातील रहिवाशांना घरातच थांबण्याचे सांगण्यात आले. इंडस्ट्रियल हब आणि २.४ कोटी लोकसंख्येच्या चेंगचुनमध्येही असेच सांगितले गेले. चेंगचुनमध्ये सुमारे ९० कार वर्षाला तयार होतात. हे देशाच्या एकूण क्षमतेच्या ११% आहे. लॉकडाऊनमुळे टोयोटा मोटर्सला प्लँटमधील काम बंद करावे लागले.