Russia Ukraine War: झेलेन्स्की यांनी दिले शुभसंकेत ; युद्ध संपुष्टात येण्याची चिन्हं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेलं युद्ध आता हळूहळू निवळत असल्याची चिन्हं दिसून येत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी याबद्दल संकेत दिलेत. तीन आठवड्यांच्या युद्धानंतर चर्चेदरम्यान रशियाकडून आता अधिक ‘वास्तववादी’ मागण्या केल्या जात असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय. दोन्ही पक्षांना चर्चेसाठी अधिक वेळ देण्याची गरज आहे. रशियाकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांवर विचार करण्यावर युक्रेनची तयारी असल्याचे संकेत झेलेन्स्की यांच्या वक्तव्यातून दिसून येतेय.

‘बैठकी सुरू आहेत आणि चर्चेदरम्यान रशियाकडून पहिल्यापेक्षा अधिक वास्तववादी मागण्या केल्या जात आहेत, असं मला सांगण्यात आलंय. परंतु युक्रेनच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी अधिक वेळेची आवश्यकता आहे’, असं रात्री उशिरा जारी केलेल्या व्हिडिओत झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

यासोबतच, युक्रेनला अधिक हत्यारांचा पुरवठा केला जावा आणि आणखीन कडक निर्बंध लादून रशियावर दबाव कायम ठेवण्याचं आवाहनही झेलेन्स्की यांनी पश्चिमी राष्ट्रांना केलंय.

रशियाची क्षेपणास्र आणि फायटर जेट रोखण्यासाठी युक्रेनच्या आकाशात नो फ्लाय झोन घोषित करण्यात यावेत, या मागणीचा पुनरुच्चारही झेलेन्स्की यांनी केलाय.

युद्धाच्या २१ व्या दिवशीही रशियन सेना युक्रेनच्या आतल्या भागात घुसखोरी करू शकलेली नाही परंतु, रशियाकडून शहरांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे, असा दावाही झेलेन्स्की यांनी केला. युक्रेनियन लष्करानं केलेल्या दाव्यानुसार, खारकीव्हमध्ये रशियन सेनेचा हल्ला अपयशी ठरलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *