श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सिटी सर्व्हेला सुरुवात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर भाविक, पर्यटकांची नियमित वर्दळ असते. मात्र, गडावर गावठाण असलेल्या जागेलगत सर्वत्र वन विभागाचे क्षेत्र असल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, आता गडावर सिटी सर्व्हेच्या कामाला प्रारंभ झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

मंगळवार (दि. 15) पासून गडावर उपअधीक्षक भूमिअभिलेखचे हेमंत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी गावाच्या चहूबाजूने वन हद्दीची पाहणी करून सर्व्हेला प्रारंभ केला आहे. सिटी सर्व्हेमुळे संबंधित जागा व त्या जागेचे महत्त्व वाढत असल्याने या सिटी सर्व्हेबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा करून सिटी सर्व्हेसाठी सप्तशृंगगडाचा समावेश करावा, असा आग्रह धरला होता. त्याला यश आल्याची भावना व्यक्त होत आहे. कळवण येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून पाहणी करून हे काम एका संस्थेला दिले आहे. या कामासाठी ग्रामसभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी आग्रही भूमिका घेतली होती. सर्व्हेप्रसंगी उपअधीक्षक राणे यांच्यासमवेत दयानंद गिते, सप्तर असोसिएटचे जयेश देवरे, सरपंच रमेश पवार, ग्रा. पं. सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, ग्रामसेवक संजय देवरे, मधुकर गवळी, विजय दुबे, धनेश गायकवाड, साई बेनके, विनायक दुबे, प्रकाश कडवे, छगन जाधव, अमृत पवार आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *