महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । घराणेशाही असलेले पक्ष देशालाच पोखरून टाकत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिढ्यानपिढ्या घराणेशाहीची पकड असणाऱ्या पक्षांवर पुन्हा आघात केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत आज बोलताना मोदी यांनी भाजपच्या ज्या खासदारांच्या मुलाबाळांना तिकिटे मिळाली नाहीत, ती माझ्यामुळे मिळाली नाहीत, असेही सांगितले.
उत्तर प्रदेशासह चारही राज्यांत भाजपने सत्ता राखल्यावर झालेली ही पहिलीच भाजप संसदीय बैठक होती. या ऐतिहासिक यशाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान मोदी यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आदी मंत्री बैठकीला उपस्थित होते.आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात ही बैठक झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घराणेबाज पक्षांच्या कारवायांना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत उघडे पाडायचे आहे. घराणेशाहीमुळेच जातीवाद वाढतो. हे पक्ष देशालाच पोखरतात. युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्याचे ‘ऑपरेशन गंगा’ यशस्वीपणे राबविल्याबाबतच्या प्रतिक्रियांवर बोलताना मोदींनी जामनगरच्या राजाने दुसऱ्या महायुद्धात पोलंडच्या लोकांना आश्रय दिला होता, त्याचे उदाहरण दिले. त्याच पोलंडच्या मार्गाने व त्या देशाच्या सहकार्याने युक्रेनमधून आमची मुले सुखरूप आली. हा जामनगरच्या राजाने तेव्हा केलेल्या मदतीची परत-पावती होती, असेही निरीक्षण मोदींनी मांडले.
‘द कश्मीर फाइल्स’ ची स्तुती
बहुचर्चित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून मुक्तकंठाने प्रशंसा केली. असे चित्रपट वारंवार तयार व्हायला हवेत, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. या चित्रपटात जे सत्य दाखविले गेले आहे जे कित्येक वर्षे दाबून ठेवण्यात आले होते, असे सांगून मोदी म्हणाले, की भारताच्या फाळणीची शोकांतिका, आणीबाणी यासारख्या भीषण घटनांवरही कोणीही चित्रपट काढला नाही. सत्य दाबून ठेवले गेले. महात्मा गांधींवरही चित्रपट निर्माण करण्याची हिंमत त्यावेळी कोणी दाखवली असती तर आम्हाला त्याबाबत संदेश जगाला देता आला असता. पण एका विदेशी निर्मात्याने गांधीजींवर चित्रपट बनविला. त्याला ऑस्कर मिळाले, तेव्हा साऱ्या जगाला महात्मा गांधीजींचे मोठेपण कळले.