महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ मार्च । दिशा सालीयन मृत्यू प्रकरणी वादग्रस्त वक्तव्ये केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना दिंडोशी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
नितेश राणे यांचा सहभाग असलेल्या पत्रकार परिषदेत दिवंगत दिशा सालीयनबाबत वक्तव्य करीत शिवसेनेवर हल्लाबोल करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पुत्र नितेश राणे यांची मालवणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. दिशाच्या पालकांनी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर राणेंवर दखलपात्र गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणी राणे पिता पुत्रांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धाव घेतली होती. आज यावर निर्णय घेण्यात आला.
नारायण राणे व नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून पंधरा हजार रुपयांचा हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. मुंबई पोलिसांनी अशा प्रकारच्या फालतू केसेसकडे लक्ष न देता ज्या क्रिमिनल केसेस आहेत त्याकडे जास्त लक्ष द्यावे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांचे वकील तिश मानेशिंदे यांनी दिली आहे.
तर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयच्या निर्णयाची प्रत प्राप्त झाली नाही. यामुळे आम्ही काही बोलणार नाही. प्रत प्राप्त झाल्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे.