Bhagwant Maan: भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ मार्च । AAP चे भगवंत मान (Bhagwant Maan) पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री बनले आहेत. आज भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांचे गाव खटखड कलां येथे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी मान यांना गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मंचावर आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक नेते उपस्थित होते.

हा भव्य शपथविधी सोहळा 100 एकराच्या परिसरात झाला. यातील 44 एकरवर मंडप उभारण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्याला सुमारे 3 ते 4 लाख लोक उपस्थित होते. या सोहळ्यात 50 हजार लोकांच्या बसण्याची सोय केली होती, तर उर्वरित ठिकाणी एलईडी बसविण्यात येणार होते. सोहळ्याच्या सुरक्षेसाठी आठ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.

पंजाब निवडणुकीत ‘आप’ने 92 जागा जिंकल्या
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आणि दोन तृतीयांश बहुमताने सत्ता स्थापन केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांनुसार, आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये 117 जागांपैकी 92 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 18 जागा जिंकता आल्या. शिरोमणी अकाली दल तीन जागा आणि भाजपने दोन जागा जिंकल्या, तर बसपने एक जागा जिंकली आणि अपक्षांनीही एक जागा जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *