पिंपरी चिंचवड करोनामुक्तीच्या मार्गावर; आणखी एका रुग्णाची चाचणी निगेटिव्ह

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ;पिंपरी चिंचवड : गेल्या ११ दिवसात एकही करोनाबाधित न सापडल्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. शहरातील १२ पैकी १० रुग्ण अगोदरच करोनामुक्त झाले असून उर्वरित दोनपैकी एका रुग्णाचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाची पहिली चाचणी झाली, ज्याचा अहवाल निगेटिव्ह होता. आता दुसऱ्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर या रुग्णाला घरी सोडलं जाईल. राज्यातील करोनाबाधितांना दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज दिला जात आहे.

‘मरकज’हून आलेले पुण्यातील ९४ जण क्वारंटाइन
यापूर्वी अमेरिकेतून आलेल्या पिंपरी चिंचवडमधील करोनाबाधिताला डिस्चार्ज देण्यात आला होता. पिंपरी चिंचवडमध्ये करोनाचे पहिले तीन रुग्ण १२ मार्च रोजी आढळले होते. हे रुग्ण २७ मार्चलाच करोनामुक्त झाले. तर शनिवारी आणखी सहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या पाच दिवसात १० जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. उर्वरित दोन रुग्णांवर उपचार सुरू असून यापैकी एकाची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे.

दिल्लीहून आलेल्या नागरिकांनी चिंता वाढवली
पिंपरी चिंचवडने लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालन करत करोनावर यशस्वी मात केली आहे. पण दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या ३२ जणांनी प्रशासनाची चिंता वाढवली आहे. यापैकी १४ जणांना महापालिकेने रुग्णालयात दाखल केलं आहे, तर अजून १८ जणांचा शोध सुरू आहे. हे नागरिक १५ दिवसांपूर्वीच शहरात आले आहेत. त्यामुळे ते अजून किती जणांच्या संपर्कात आले याविषयी चिंता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *