![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । हापूसचा हंगाम सुरु झाला असून फळांचा राजाचं आगमन बाजारात झालं आहे. पण तुम्ही खरेदी करत असलेला आंबा हापूसच आहे का? हे एकदा पडताळून घ्या. कारण हापूसच्या नावाखाली कमी प्रतीचा आंबा देऊन ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
बाजारपेठांमध्ये हापूस दाखल झाला आहे. अशातच हापूस म्हणून कमी प्रतिचा आंब्याची विक्री होत असल्याचं उघडकीस आलं आहे. पुण्यामध्ये बनावट हापूस दाखल झाला आहे. हापूसच्या नावाखाली कमी प्रतीचा आंबा देऊन फसवणूक केली जात आहे. पुण्यात ग्राहकांची अशीच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बनावट हापूसच्या 42 पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही बाजार समितीच्या प्रशासकांनी दिला आहे.
हापूसच्या नावाखाली दक्षिण भारतातून येणाऱ्या कमी प्रतिच्या आंब्यांची विक्रि करण्याचं प्रमाण महाराष्ट्रात वाढीस लागलं आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनं मात्र अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत बनावट हापुसच्या 42 पेट्या जप्त केल्या आहेत. कर्नाटक हापूस म्हणून ओळखला जाणारा हा आंबा कोकणचा हापूस म्हणून विकला जात असल्यानं ग्राहकांबरोबरोच कोकणातील शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे इथुन पुढे अशी फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई देखील करण्यात येईल, असं बाजार समितीच्या प्रशासकांनी म्हटलं आहे.