Weather Alert ! महाराष्ट्रासह या राज्यात अवकाळी पावसाचे ढग, येत्या 3 तासात याठिकाणी बरसणार सरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । गेल्या काही दिवसांत देशभरात उन्हाचा तडाखा वाढला (temperature rise) आहे. एकीकडे देशात तापमान वाढत असताना बंगालच्या उपसागरात ऐन मार्चमध्ये चक्रीवादळाची (Cyclone) स्थिती निर्माण झाली आहे. सध्या आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा (Low pressure area) निर्माण झाला आहे. आज सकाळापासून याची तीव्रता आणखी वाढली आहे. पुढील दोन दिवसांत हवेच्या या कमी दाबाच्या क्षेत्राचं ‘असानी’ चक्रीवादळात (Asani Cyclone) रुपांतर होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे.

सुदैवाची बाब म्हणजे या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला कोणताही धोका नाही. मंगळवारी हे ‘असानी’ चक्रीवादळ बांगलादेश- उत्तर म्यानमारच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. एकीकडे भारतीय समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाली असताना महाराष्ट्रात मात्र संमिश्र हवामान निर्माण झालं आहे. पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर आज दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

पुढील दोन ते तीन तासात महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार, संबंधित परिसरात अवकाळी पावसाचे दाट ढग आढळले आहेत. त्यामुळे येत्या काही तासात याठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झाली आहे. तर पुण्यासह सातारा आणि घाट परिसरात देखील तुरळक ठिकाणी सरी बरसणार आहेत.

दुसरीकडे, हवामान खात्याने पुढील तीन दिवस विदर्भासह महाराष्ट्रातील विविध भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने आज बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या सात जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. उद्या अकोला, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर परिसरात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. सोमवार पासून विदर्भातील तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *