महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेला संघर्ष थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. त्यातच रशियाने शुक्रवारी युक्रेनवर हल्ला करण्यासाठी पहिल्यांदाच आपल्या किंझल हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर केला. त्यामुळे आता या संघर्षाची तीव्रता वाढत असताना दिसतेय. युक्रेनच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या शस्त्रास्त्रांचा साठा नष्ट करण्यासाठी रशियाने हा हल्ला केला. यामुळे आता युक्रेनवर हल्ला करताना रशिया सर्व मर्यादांचं ओलांडताना दिसत आहे.
रशियाने यापूर्वी कधीही युद्धात एवढ्या उच्च स्तरावरील शस्त्रं वापरली नाव्हती. वृत्तसंस्था RIA नोवोस्तीने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षादरम्यान किंझल हायपरसोनिक शस्त्रांचा हा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे. “किंझल या हायपरसॉनिक एरोबॅलिस्टिक क्षेपणास्त्रांने दारूगोळा असलेला एक मोठा भूमिगत गोदाम नष्ट केला” असं रशियन संरक्षण मंत्रालयाकडून देखील सांगण्यात आलं आहे.
रशिया युक्रेनमध्ये आज १८ व्या दिवशी देखील युद्ध सुरूच आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, तर शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. आपल्या आईसाठी औषध आणायला गेलेल्या एका तरुणीवर रशियन सैनिकांनी गोळीबार केला. यामध्ये या तरुणीसह तिची आई आणि कार चालकाचा देखील मृत्यू झाला.
किंझल हे एक अद्ययावत क्षेपणास्त्र असून, त्याचा वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा १० पटीने जास्त आहे, तसंच ते एअर डिफेन्स सिस्टीमला सुद्धा भेदू शकतं अशी माहिती स्वत: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली आहे. पुतिन यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच देशाच्या संरक्षण विभागाला सुपूर्द करण्यात आलेल्या वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांपैकी किंझल हे एक क्षेपणास्त्र आहे.