महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । राज्यभरात उष्णतेची लाट उसळलेली असताना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही तालुक्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणीय बदल झाले आहेत. यामुळे उपसागरात चक्रीवादळसदृष्य परिस्थिती तयार झाली आहे. १९ ते २२ मार्चपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार आहे. सध्या अंदमानकडे जाणाऱ्या विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Weather Forecast)
यातच अरबी समुद्रात प्रि मान्सून स्थिती तयार झाल्याने कोकणातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि गोव्यात वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज आहे. असनी या चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनारपट्टीला बसणार नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी सुरक्षित आहे. मात्र, अवकाळी पाऊस झाल्यास काजू आणि आंब्याला धोका पोहोचणार आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यात तापमानात वाढ होत आहे. कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. गेल्या २४ तासांत विदर्भातील तापमान ४० अंशाच्या पार गेलं असून अकोला येथे सर्वाधिक ४२.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच आज आणि उद्याही विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम-
राजस्थान व गुजरातसह अन्य राज्यांतील लाटसदृश वातावरणामुळे राज्यातील काही भागांत उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. विदर्भात सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसतोय. आज १७ मार्च आणि उद्या १८ मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.