महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ मार्च । चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्यप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी रेस्क्यू टीम दाखल झाले असून, घटनास्थळी बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, या बोईंगने दक्षिण-पश्चिम युनान प्रांतातील कुनमिंग चांगशुई विमानतळावरून दुपारी १.१५ वाजता उड्डाण केले. दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील ग्वांगझू विमानतळावर दुपारी 3.07 वाजता ते उतरणार होते. अपघातग्रस्त बोईंग हे 162 सीटर असून, यामध्ये बिझनेस क्लासमध्ये 12 तर, इकॉनॉमी क्लासमध्ये 150 सीट आहेत. याबाबत इंडिया टुडेने वृत्त प्रकाशित केले आहे. (Plane Crashes In China)
अपघातग्रस्त विमान चायना इस्टर्न एअरलाइन्सचे असून ते 133 प्रवाशांना घेऊन कुनमिंगहून ग्वांगझूला निघाले होते. त्यावेळी गुआंग्शी प्रदेशात या विमानाला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तो डोंगराळ भाग असून अपघातानंतर डोंगरावर आग लागली आहे. दरम्यान, विमानात प्रवास करत असेलल्या प्रवाशांबद्दल अद्यप कोणतीही माहिती समजू शकलेली नसून, घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
चायना इस्टर्न ही चीनच्या प्रमुख तीन एअरलाइन्सपैकी एक असून, ही कंपनी त्यांची सेवा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देते. हे विमान जून 2015 मध्ये बोईंगकडून चायना इस्टर्नला देण्यात आले होते आणि सहा वर्षांपासून ते सेवेत कार्यरत होते. ट्विन-इंजिन, सिंगल आयल बोईंग 737 हे लहान आणि मध्यम अंतराच्या उड्डाणांसाठी जगातील सर्वात लोकप्रिय विमानांपैकी एक आहे.