Cyclone Asani: हवामान खात्याचा हाय Alert ; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचं संकट तीव्र ; पुढील 12 तास महत्त्वाचे,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ मार्च । आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचं येत्या काही तासांत चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात हे वादळ सध्या डीप डिप्रेशनच्या स्वरुपात आहे. येत्या 12 तासात याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 12 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आज सकाळपासून अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळी वाऱ्याची तीव्रता वाढली आहे. परिसरातील अनेक ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘असनी’ चक्रीवादळ (Asani cyclone) हे 2022 वर्षातलं पहिलं चक्रीवादळ ठरणार आहे.

येत्या 12 तासात उत्तर अंदमान-निकोबार बहुतांशी ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. याचा सर्वाधिक फटका दक्षिण अंदमान बेटांना बसणार असून येथील सर्वच ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सतर्कतेचं पाऊल म्हणून परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच परिसरात मालवाहतूक करणारी जहाजं किनारपट्टीवरच रोखून धरण्यात आले आहेत.

असनी चक्रीवादळाचं डीप डिप्रेशन सध्या अंदमान निकोबार बेटावरील मायाबंदरपासून आग्नेयच्या दिशेनं 120 किमी अंतरावर आहे. तर कार निकोबार पासून उत्तर ईशान्य दिशेला 320 किमी अंतरावर आहे. तसेच हे डीप डिप्रेशन म्यानमारमधील यांगूनपासून दक्षिण नैऋत्य दिशेनं 560 किमी अंतरावर आहे. हे डीप डिप्रेशन आता वेगानं म्यानमार आणि बांगलादेशच्या दिशेनं पुढे सरकत आहे. येत्या काही तासांत याचं रुपांतर चक्रीवादळात होणार असून 22 मार्च रोजी हे वादळ म्यानमार आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रात मात्र याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. कोकणासह घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रात आज ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसला तरी बंगालच्या उपसागरात मासेमारी करणाऱ्या जाणाऱ्या मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *