महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ मार्च । जगातील काही देशात कोरोनाने पुन्हा कहर केला आहे (Coronavirus outbreak). काही शहरांमध्ये लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही कोरोनाच्या उद्रेकाबाबत इशारा दिला आहे. त्यामुळे आता भारताने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. जगभरातील देशांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
सध्या भारतात फ्रंटलाइन वर्कर आणि 60 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनाच कोरोना लशीचा बुस्टर डोस दिला दातो आहे. रॉयटर्सने सूत्रांचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, जगात कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. चीन, युरोपसह दक्षिण आणि पूर्व आशियातही कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार बुस्टर डोस देण्याचा विचार करत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जागतिक स्तरावर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आठवड्यात संसर्गाची सुमारे 1.1 कोटी नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बहुतेक पश्चिम पॅसिफिक प्रदेशात कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत.
WHO च्या मुख्य तांत्रिक अधिकारी मारिया व्हॅन केरखोव्ह (Maria Van Kerkhove) म्हणाल्या, “कोरोना महामारीबाबत जगभरात अनेक प्रकारचे गैरसमज पसरवले जात आहेत. हा गैरसमज लोकांमध्ये पसरवला जात आहे की महामारी संपली आहे, ओमिक्रॉन अतिशय सौम्य आहे आणि ओमिक्रॉन हे कोविड-19 चा शेवटचा प्रकार आहे. अशा गैरसमजांमुळे कोरोनाचा वेग पुन्हा वाढू लागला आहे. चुकीची माहिती पसरवण्यासोबत अनेक कारणे आहेत, ज्यामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत आहे”
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “कोरोनाच्या चाचण्या कमी असूनही जागतिक स्तरावर रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाच्या उद्रेकात वाढ होईल, असं अपेक्षित आहे”
WHO ने वाढत्या केसेसवर चिंता व्यक्त करून आशियातल्या काही भागांमध्ये, लसीकरण वाढवण्याचं आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचं आवाहन केलं आहे.