राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट ; पुढचे 3 दिवस पावसाचे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ मार्च । पुणे , मुंबई, ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर राज्यातील काही भागात पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. सध्या तिथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसोबत महाराष्ट्रावरही होणार आहे.

चक्रीवादळाचा थेट तडाखा महाराष्ट्राला बसणार नसला तरी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि 23, 24 आणि 25 मार्चला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ढगाळ वातावरणाचा आंबा आणि काजू पिकांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत. विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. त्यामुळे त्या भागात माठाची मागणी वाढत आहे.

भंडारा जिल्ह्यातील पालंदूर गावात तयार होणारे माठ थेट जिल्ह्याच्या बाहेर जात आहेत. विदर्भातही माठाची मागणी वाढली आहे. एकीकडे कमालीची उष्णता तर दुसरीकडे ढगाळ वातावरण यामुळे नागरिकांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *