महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; मुंबई – : कोरोनाव्हायरची साथ भारतात सुरू झाली त्याला आता जवळजवळ महिना झाला. सुरुवातीला मोठ्या शहरांपुरता आणि परदेशी प्रवाशांपुरता असलेला संसर्ग गेल्या काही दिवसात देशभर झपाट्याने वाढतो आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या भारतात अजूनही इतर काही देशांच्या तुलनेत कमी आहे. ही साथ दुसऱ्या टप्प्यातच असल्याचं यंत्रणांचं म्हणणं आहे. पण ही साथ लॉकडाउन काळ संपल्यानंतर वेगाने फैलावू शकते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे मध्ये कोरोना साथ कळस गाठू शकते, असा ICMR मधील तज्ज्ञांचा अंदाज आहे.
भारतात या साथीचा कहर (Peak of pendemic) या महिन्याच्या अखेरीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लॉक डाउन संपलं तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेच लागणार आहेत. इटली आणि स्पेनमध्ये जे आत्ता घडत आहे तसा वेगाने फैलाव आणि वाढता मृत्युदर रोखायचा असेल तर घरात राहणं याला पर्याय नाही, असं तज्ज्ञ सांगतात. गर्दी टाळली तरच या विषाणूचं संक्रमण आटोक्यात राहील. भारतासारख्या देशात लोकसंख्या आणि राहण्याची पद्धत लक्षात घेता कोरोनाची साथ उग्र रूप धारण करू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.