महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० मार्च । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 31) मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत श्री विठ्ठल- रखुमाईच्या पदस्पर्श दर्शनाबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले पदस्पर्श दर्शन सुरू करावे, यासाठी वारकरी भाविकांची आग्रही मागणी होती. या मागणीच्या अनुषंगाने मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर व समितीच्या सदस्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यासह समितीचे बहुतांश सदस्य उपस्थित होते.
कोरोनामुळे देवाच्या चरणाचे दर्शन बंद ठेवून फक्त मुखदर्शन सुरू होते. गेली दोन वर्षे भाविक आणि देवाच्या थेट भेटीत अंतर पडले होते. त्यामुळे पददर्शन सुरू करा, अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष हभप अरुण महाराज बुरघाटे व हभप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी केली होती. हभप जोगदंड यांनी मंदिराजवळ भजन आंदोलन केले होते. यानंतर सहअध्यक्ष हभप औसेकर यांनी मंदिर समितीची बैठक घेऊन दर्शन व्यवस्था सुरू करण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविला होता. आज सहअध्यक्ष औसेकर यांच्या समितीने मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाडव्यापासून पददर्शन सुरू करण्याची विनंती केली. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी कोरोनाबाबत अद्यापि सर्व नियम शिथिल झालेले नाहीत. उद्या (दि. 31) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा आशावाद व्यक्त केला.