CM Uddhav Thackeray : गुढीपाडव्याआधी मास्कमुक्ती झाली; अखेर नव्या वर्षात घेता येणार मोकळा श्वास ; पण…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मार्च । गेल्या २ वर्षापासून जगभरात कोरोना महामारीची दहशत कायम होती. मात्र आता हळूहळू महामारी नियंत्रणात येत असल्याने कोरोनामुळे घातलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातही गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला होणाऱ्या मिरवणुका मोठ्या जल्लोषात काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) म्हणाले की, गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले. त्याचसोबत मास्क घालणं ऐच्छिक असेल. त्यावर कुठलीही सक्ती केली जाणार नाही असं राजेश टोपेंनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *