युक्रेनचा जोरदार पलटवार, प्रथमच रशियाच्या भूभागावर केले हवाई हल्ले, बेलगोरोड शहराचा तेल डेपो केला उद्ध्वस्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ एप्रिल । रशिया-युक्रेन युद्धाच्या 36 व्या दिवशी युक्रेनने प्रथमच रशियावर हवाई हल्ले केले. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, युक्रेनच्या 2 हेलिकॉप्टर्सनी शुक्रवारी पश्चिम रशियातील बेलगोरोड शहरावर हवाई हल्ले करुन एक तेल डेपो उद्ध्वस्त केला. या हल्ल्यात 2 जण जखमी झाल्याचा दावा केला जात आहे.

प्रस्तुत युद्धात दोन्ही देशांच्या लष्करासह सर्वसामान्य लोकांचेही मोठे नुकसान होत आहे. युक्रेनच्या प्रोसिक्युटर जनरल कार्यालयाच्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 153 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 245 हून अधिक मुले जखमी झालेत.

रशियाची चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातून माघार

अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, रशियन लष्कराने 24 फेब्रुवारी रोजी चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर नियंत्रण मिळवले होते. आता ते तेथून काढता पाय घेत आहेत. रशियन सैन्य बेलारुसच्या दिशेने जात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

अमेरिका दररोज 10 लाख बॅरल कच्चे तेल जारी करणार

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेन हल्ल्यामुळे वाढणाऱ्या तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील 6 महिने दररोज 10 लाख बॅरल तेल जारी करण्याची घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने रशियावरील आर्थिक निर्बंधांमुळे कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे.

इतर अपडेट्स

पुतीन म्हणाले, रशियाकडून नैसर्गिक वायू खरेदी करण्यासाठी परदेशी खरेदीदारांना रशियन बँकांत रुबल खाते खोलावे लागेल. आजपासून याच खात्यांतून गॅस पुरवठ्याचे पेमेंट स्विकारले जाईल.
नाटोचे सरचिटणीस जेंस स्टोल्टेनबर्ग म्हणाले, रशियाचे युक्रेनमधील सैन्य माघार घेत नसून, ते डोनबास क्षेत्रात एकत्र होत आहे.
अमेरिकेच्या एका कंपनीने म्हटले की, रशिया-युक्रेन युद्ध सुरू होताच यूरोपमध्ये सायबर हल्ला झाला होता.
संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, युक्रेनमधून आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांना देशातून पलायन करण्यास मजबूर झालेत.
युक्रेनमनधील नुकसानीवर एक नजर

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, रशियाने आतापर्यंत 1370 क्षेपणास्त्र डागलेत. तसेच युक्रेनचे 15 विमानतळही उद्ध्वस्त केलेत.
रशियाच्या लष्कराने युक्रेनच्या द्विप्रोपेत्रोव्ह्स्क क्षेत्रातील लष्करी तळावर हल्ला केला. येथील हल्ल्यात 2 जण ठार झाल्याचा दावा गव्हर्नर व्हॅलेंटिन रेजनिचेंको यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *