महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ एप्रिल । कोरोना (Corona) निर्बंध पूर्णपणे शिथिल झाल्यानंतर बाजारात खऱ्या अर्थाने उत्साह दिसू लागला आहे. उन्हाचा कडाका वाढत असतानाही बाजारात नागरिकांचा उत्साह आहे. सराफी व्यवसायही याला अपवाद नव्हता. सोन्याच्या दरातील तेजी सोबतच खरेदीदारांची गर्दी हेही आजच्या गुढीपाडव्याच्या उत्साहाचे वैशिष्ट्य ठरले. (Gudi Padwa festival)
साडेतीन मुहूर्तांपैकी प्रमुख मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला बाजारात उत्साह आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोन्याच्या दरातही तेजी असल्याने निर्बंध शिथिलीकरणानंतरची गर्दीमुळे सोने लखलखले होते. शनिवारी (ता. २) नाशिकच्या किरकोळ बाजारात शुध्द सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमला सोन्याचे दर साधारण ५२ हजार ते ५२ हजार ३०० होते. त्यामुळे खरेदीसाठी भल्या पहाटेपासून रस्त्यावर आणि बाजारात तर सायंकाळी मुहूर्तावरील खरेदी साधण्यासाठी सराफी पेढ्यांवर नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सोने खरेदी-विक्रीसाठी आजचा दिवस चांगला ठरला. प्राप्तीकर विभागाच्या चौकशीच्या भीतीमुळे उलाढालीबाबत अनेकांनी मौनच साधले, परंतु साधारण ५० कोटीपर्यंत उलाढालीचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तविला.
मुहूर्तावर सोने खरेदीमुळे धनसंचय होतो, अशी पारंपरिक धारणा आहे. यंदा विवाहाच्या हंगामात साधारण ६४ विवाह मुहूर्त असल्याने लॉकडाउनमुळे रखडलेल्या घरातील विवाहाच्या संख्या यंदा जोरात आहे. विवाहाच्या दागिने खरेदी शक्यतो चांगल्या मुहूर्तावर करण्याची रीत आहे. त्यामुळे विवाहाच्या खरेदीला गुढीपाडव्याचा मुहूर्त साधायला लग्न घराच्या मंडळीचा भावी वधू-वरांचा चांगला प्रतिसाद होता. गुढीपाडव्याला घरातील मृत पितरांचे चांदीचे टाक करण्यासह कुलदेवतांचे नवीन टाक करण्याची किंवा आहे त्या देवात तसेच माशी लागलेल्या देवाच्या टाकात नवीन चांदीची भर टाकून देव घडविण्याची आणि गुढीपाडव्याला देवाची प्रतिष्ठापणा करण्याची रीत आहे. त्यामुळे आठवड्यापासून चांदीच्या देवांचा बाजार तेजीत आहे.
खरेदीत कमी वजनाचे टेम्पल ज्वेलरी तसेच, पिंक गोल्ड, रोज गोल्डची तर लहान लहान गुंतवणुकीसाठी सोन्याची वेढी शिक्के याला मागणी होती. इटालियन सिल्वर ज्वेलरीचे ट्रेंड असल्याने त्यालाही चांगला प्रतिसाद दिसला. काही व्यावसायिकांनी ऑनलाइन खरेदीची व्यवस्था केल्याने तरुणांचा ऑनलाइन सोने खरेदी केली.