महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ एप्रिल । गेल्या दोन वर्षापासून देश कोरोनाच्या संकटाशी सामना करत होता, परंतु देश आता या संकटातून सावरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेले निर्बंध सरकारने हटवले आहेत. कोरोना काळात जनजागृती करण्यासाठी सुरु करण्यात आलेली कॉलर ट्यूनही आजपासून बंद झाली आहे. त्यामुळे कोणालाही कॉल केला असता ऐकू येणारी “नमस्कार.. इस वक्त पुरा देश कोरोना व्हायरस याने कोविड 19 से लढ रहा है…”ही कॉलर ट्यून आता ऐकायला मिळणार नाही. जवळपास 21 महिने जनजागृती करणारी ही कॉलरट्यून आता बंद झाली आहे. (The Corona Caller Tune, has stopped from today.)
कॉल करण्यापूर्वी कोरोना खबरदारीच्या उपायांशी संबंधित सूचना बंद केली जाऊ शकते, अशी माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानंतर आजपासून ही कॉलर ट्यून बंद झाल्याची माहिती समोर येत आहे. दररोज ऐकू येणारी कोरोना ट्यून आज ऐकायला मिळाली नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी दूरसंचार विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून प्री-कॉल घोषणा आणि कॉलर ट्यून काढून टाकण्याची विनंती केली होती. त्यात सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया तसेच मोबाईल ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांचा उल्लेख केला होता. यामुळेच आरोग्य मंत्रालय (government) देशातील साथीच्या परिस्थितीत सुधारणा लक्षात घेऊन ऑडिओ क्लिप काढून टाकण्याचा विचार करीत होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनंतर दूरसंचार सेवा कंपन्यांना कोरोना संबंधित घोषणा आणि कॉल करण्यापूर्वी कॉलर ट्यून लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याद्वारे नागरिकांना साथीच्या आजारादरम्यान घ्यायची खबरदारी आणि लसीकरणाविषयी माहिती देण्यात येत होती. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. आता तो उद्देश साध्य झाल्याने ही कॉलर ट्यून बंद करण्याचा विचार सुरु होता.
जवळपास २१ महिने या कॉलर ट्यूनने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने काम केले. आता त्याची गरज (Corona Restriction) नाही. नेटवर्कवरील या संदेशांमुळे आणीबाणीच्या काळात महत्त्वाचे कॉल कनेक्ट होण्यास विलंब होण्याचा धोका राहतो. त्यामुळे ही कॉलर ट्यून आता बंद करण्याची मागणी होत होती.