महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ एप्रिल । मनसेच्या वर्धापन दिनाला राज ठाकरेंनी पुण्यात अनेकांचा समाचार घेतला होता. यावेळी बोलतांना त्यांनी आजचे भाषण म्हणजे केवळ टिझर आहे. खरा पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर असा थेट इशारा दिला होता. मनसेकडून शिवसेना भवनासमोर आणि शिवाजी पार्क समोर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. शिवसेना भवनासमोर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्यानंतर कट्टर हिंदु रक्षक राज ठाकरे अशा आशयाचा बॅनर लावत, शिवसेनेला डिवचले आहे.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा राज ठाकरे यांची फटकेबाजी कोणावर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनासमोर केलेज्ल्या बॅनरबाजीवरून ते शिवसेनेला टार्गेट करतील असे दिसून येत आहे.
शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत युती केल्याने शिवसेना हिंदुत्त्वापासून दूर गेली अशी टीका कायम त्यांच्यावर होत आहे. आणि हिंदुत्त्वाची हीच राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राज ठाकरे प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या वक्तयव्यातून दिसून येत आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ते मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका करतील. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांचा प्रचार मतदारांना भावल्यास राज्यातील आगामी महानरपालिका निवडणुकांमध्ये मनसेच्या मतदारांची संख्या वाढू शकते.