महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 3 एप्रिल । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल(शनिवार) गुढीपाडव्या निमित्त शिवाजी पार्कवरून केलेल्या भाषणानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या भाषणात राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर सडकून टीका केली, तर भाजपावर टीका करणं मात्र त्यांनी टाळलं. शिवाय, राज्यातील मदरशांवर कारवाई करण्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी देखील त्यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या कालच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. शरद पवार यांनी आज राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले, त्या पाठोपाठा शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली, राज ठाकरेंच्या कालच्या भाषणाचं राज ठाकरे यांनी जाहीर कौतुक केलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ”एका सामान्य हिंदूला मनामध्ये आनंद होणारं भाषण झालं. मला राज ठाकरेंचा एक शब्द खूप आवडेलला आहे की, मी धर्मांध नाही पण धर्माभिमानी आहे. आपल्या देशात १९९४७ नंतर सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता याचं इतकं स्तोम माजलं की, हिंदूंना हिंदू म्हणून घ्यायला लाज वाटायला लागली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे सगळं श्रेय जातं की, १९२५ पासून डॉ. हेडगेवार यांनी सातत्याने ही जाणीव देण्याचा प्रयत्न केला की, पाच हजार वर्षाचा उज्ज्वल इतिहास तुमचा आहे. ५०० वर्षांचा मुघलांच्या आक्रमणाचा इतिहास तुमचा नाही. त्यामुळे हिंदू आहे याचा मला गर्व असला पाहिजे. पण सातत्याने पुस्तकातून शिक्षणातून, भाषणातून हे मांडण्याचा प्रयत्न झाला, की हिंदू म्हणजे बुरसटलेला. खरं म्हणजे हिंदू या शब्दामध्ये धर्मनिरपेक्ष भाव आहे. हिंदू या शब्दामध्येच सर्वधर्म समभाव आहे. या देशातील मुसलमान हा बाहेर, जाऊ शकत नाही तो या देशाचा नागरिक आहे. खरंतर त्याने या देशाला स्वत:चा देश मानलं पाहिजे, पाकिस्तानाला मानू नये. त्याने या देशाबद्दल अभिमान बाळगला पाहिजे.”