महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.५ एप्रिल । राज्यात (state) पुन्हा एकदा अवकाळीचे सावट निर्माण झालं आहे. राज्यात अवकाळी पावसाचं (unseasonal rains)वातावरण झालं आहे. सोमवारी संध्याकाळी राज्यातल्या तुरळक ठिकाणी गडगडाट झाल्याचं माहिती समोर येतेय. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तसंच दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातल्या अवकाळी सावटामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसंच कोकणातल्या आंब्यावरही परिणाम होण्याची भीती आहे.
राज्यात अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण होण्यामागचं कारण की, मराठवाड्यापासून तमिळनाडूच्या अंतर्भागापर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. आज आणि उद्या म्हणजेच मंगळवारी आणि बुधवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे गडगडाट, जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर येत्या गुरुवारी याच परिसरात हलक्या सरी होण्याचीही शक्यता आहे.
गृहमंत्र्यांच्या भाषणादरम्यान सुरु झालं अजान अन्… Video चर्चेत
कोल्हापूर, सातारा येथेही उद्यापर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटाची शक्यता आहे. तर सोलापूर, सांगली, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ येथेही आज तुरळक ठिकाणी गडगडाटाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईतल्या सापेक्ष आर्द्रतेमध्ये वाढ झालीय. मुंबईत रविवारी सापेक्ष आर्द्रता दिवसभर 55 टक्क्यांच्या आसपास होती. तर सोमवारी त्यात वाढ झाली. आर्द्रता जवळपास 75 टक्क्यांच्या आसपास पोहोचली. कुलाबा येथे दोन अंशांनी तापमानात वाढ झाली. कुलाब्यात सोमवारी कमाल तापमान 34.2 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे 33.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. किमान तापमानातही 1 ते 1.5 अंशांची वाढ सोमवारी नोंदली गेली. कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्हीकडे किमान तापमानाचा पारा 24.5 अंशांच्या पुढे पोहोचला.
दरम्यान आज आणि उद्या किमान तापमानाचा पारा 26 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कमाल तापमान 33 ते 34 अंशांच्या आसपास असणार आहे. तर मुंबईत शनिवारपर्यंत आभाळ अंशतः ढगाळ असण्याचीही शक्यता वर्तवली आहे. तर पुढचे दोन दिवस संध्याकाळनंतर मुंबईत ढगाळलेले आभाळ असू शकतं.