शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता जप्त, आयकर विभागाची या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.८ एप्रिल । महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा कारवाईचा धडाका सुरूच आहे. गुरुवारी रात्री उशिरा आयकर विभागाने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता जप्त केल्या. गेल्या महिन्यात जाधव यांच्या दोन घरांवर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले होते.

आयकर विभागाने आज जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये वांद्रे येथील 5 कोटी रुपयांच्या भूखंडाचा समावेश आहे. याशिवाय भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेमधील 5 कोटींचे दोन फ्लॅट्सही आयकर विभागाने जप्त केले आहेत. गेल्या वर्षभरात आयकर विभागाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. यशवंत जाधव यांच्यासोबतच त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या काही मालमत्ताही आयकर विभागाने जप्त केल्या आहेत. नातेवाईकांच्या नावावर असलेल्या या मालमत्ता यशवंत जाधव यांच्याच असल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. मुंबईचे ठेकेदार विमल अग्रवाल यांच्या मालकीची ‘न्यूशॉक मल्टिमिडीया प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी, सासू सुनंदा मोहिते यांच्या नावावर असलेल्या हॉटेल्स या यशवंत जाधव यांनीच खरेदी केल्याचे आयकर विभागाच्या तपासात समोर आले आहे.

काही दिवसांपुर्वीच आयकवर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. त्यावेळी घरातून एक डायरी अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. या डायरीत केबलमन आणि एम-ताई यांना पैसे दिल्याचा उल्लेख आहे. यापूर्वी 2 कोटी 50 लाख रुपयांचे घड्याळ ‘मातोश्री’ला दिल्याचे या डायरीत आढळले होते. मातोश्री म्हणजेच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. जाधव यांनी मात्र आपण आपल्या आईसाठी मातोश्री हा शब्द वापरला होता आणि आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटवस्तू दिल्याचा दावा केला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *