महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ एप्रिल । राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari) अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहणार नाहीत. सध्या पावसामुळं महाराष्ट्र केसरीचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. त्यामुळं आयोजकांच्या विनंतीवरुन शरद पवारांनी साताऱ्याचा दौरा रद्द केला आहे.
शरद पवार साताऱ्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याला उपस्थित राहणार नाहीत. शरद पवारांकडून त्यांचा सातारा दौरा रद्द करण्यात आला आहे. काल साताऱ्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या ठिकाणी पाऊस पडल्याने शरद पवार सातारला जाणार नाहीत असं सांगण्यात आलं आहे. शरद पवार उद्या मुंबईहून थेट नागपूर आणि तिथून अमरावतीला जातील. शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती लावण्यात येणार होती.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी सांगितलं की, काल सातारमधील महाराष्ट्र केसरी कुस्ती परिषदेच्या ठिकाणी झालेल्या पावसामुळे मैदानाची अवस्था खराब झाली आहे. अशा परिस्थितीत साताऱ्याला येणे योग्य ठरणार नाही हे शरद पवारांना फोन करुन सांगितले. त्यानंतर शरद पवारांनी त्यांच साताऱ्याला जाणं रद्द केलं आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या ठिकाणी काल मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळं मंच आणि मैदान खराब झाले, आखाड्यातील मातीचे नुकसान झाले. शिवाय मॅटमधील काही गाद्याही भिजल्या. यामुळे शरद पवार येणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली होती.