शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ एप्रिल । शिर्डीतील तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला शनिवारी भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. पहाटेच्या काकड आरतीनंतर साई प्रतिमा, वीणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. साई समाधी मंदिरातून ही मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी साईसत्चरित्र ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले आणि उत्सवास सुरुवात झाली. उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

साईबाबांच्या संमतीने सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. शिर्डीत रामनवमी उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. कोरोनाच्या संकटकाळात दोन वर्ष रामनवमी उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा झाला होता. मात्र आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्याने रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे.

शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. उत्सवानिमित्ताने साईमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली‌ आहे. तर साई संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

साईबाबा संस्‍थानचे अध्‍यक्ष आशुतोष काळे यांनी पोथी, उपाध्‍यक्ष अॅड. जगदीश सावंत व विश्‍वस्‍त अॅड.सुहास आहेर यांनी प्रतिमा व विश्‍वस्‍त अविनाश दंडवते हे वीणा घेऊन सहभागी झाले होते. याप्रसंगी विश्‍वस्‍त सचिन गुजर, राहुल कनाल, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्‍त व ग्रामस्‍थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *