Dilip Walse Patil: राज्यातील घडामोडींना वेग, सिल्व्हर ओकवरून बाहेर पडल्यानंतर वळसे-पाटील वर्षा बंगल्यावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ एप्रिल । एसटी आंदोलकांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर केलेल्या उग्र आंदोलनानंतर राज्यातील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. आज सकाळपासून मुंबईत महाविकास आघडीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. काही वेळापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. तेथून बाहेर पडताना संजय राऊत यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या होत्या. यानंतर गृहमंत्री वळसे-पाटील यांनीही सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

सिल्व्हर ओकवरून बाहेर पडल्यानंतर दिलीप वळसे-पाटील तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. काही वेळापूर्वीच वळसे-पाटील वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. सध्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हेदेखील उपस्थित आहेत. एसटी आंदोलकांचा जमाव कोणालाही थांगपत्ता न लागून देता शरद पवार यांच्या घरापर्यंत पोहोचलाच कसा, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. हा प्रकार म्हणजे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनीही केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्याचे गृहखाते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याशिवाय, संजय राऊत हे देखील आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आगामी काळात महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *