महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ एप्रिल । मशिदींवरील भोंगे सरकारनं उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत घेतली. त्यानंतर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यास सुरुवात केली. मात्र काही नेत्यांची राज यांच्या भूमिकेमुळे अडचण झाली. पुण्यातील मनसेचे महत्त्वाचे नेते वसंत मोरेंनी त्यांची अडचण जाहीरपणे बोलून दाखवली. त्यानंतर त्यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. मोरे सातत्यानं राज यांच्या भेटीसाठी वेळ मागत होते. अखेर आज मोरे आणि राज ठाकरेंची भेट होणार आहे. त्यासाठी मोरे पुण्यातून मुंबईला रवाना झाले आहेत.
राज ठाकरेंनी मला भेटीसाठी बोलावलं आहे. राज यांच्या भेटीसाठी पहिल्यांदाच जातोय अशातला काही भाग नाही. पण आता पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे, असं मुंबईच्या दिशेनं रवाना झालेल्या मोरेंनी सांगितलं. शहरातील पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत माझ्या काही अडचणी आहेत. त्या मी राज ठाकरेंच्या कानावर घालणार असल्याचं मोरेंनी सांगितलं. मोरेंनी मशिदीवरील भोंग्यांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्यानंतर पुण्यातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत मोरेंवर जोरदार टीका केली होती.