महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ एप्रिल । राज ठाकरे यांची उत्तरसभा संध्याकाळी असली तरीदेखील ते मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच ठाण्यात हजेरी लावणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. सायंकाळची होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन ते दुपारीच ठाण्यात मुक्कामी येणार आहेत. यावेळी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात ते मनसे पदाधिकाऱ्यांशी आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहेत. ते दुपारीच येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी सज्ज केलेल्या चारचाकी आणि दुचाकीस्वारांची तयारी दुपारीच करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी दिली.
प्रदीर्घ कालावधीनंतर ठाण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. मंगळवारी होणाऱ्या उत्तरसभेत ते काय बोलणार याची उत्सुकता शिगेला गेली आहे. परंतु, त्यासाठी शहर मनसेने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी हातात भगवे झेंडे घेऊन तब्बल २०० चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांच्या रॅली ठाण्याच्या वेशीवरून थेट सभास्थळापर्यंत आणण्यात येणार आहे. एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग या सभेच्या निमित्ताने फुंकले जाणार असल्याचे दिसत आहे.