राज्यात लोडशेडींग आणखी वाढणार ? वीजेची तूट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ एप्रिल । उष्णतेच्या लाटेमुळे राज्यात विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. असे असतानाच कोळसा उपलब्ध नसल्याने अपुऱ्या वीज निर्मितीमुळे सुमारे राज्यात अडीच ते तीन हजार मेगावॉट विजेची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी आणि ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार असल्याचे ‘महावितरण’ने जाहीर केले आहे.

फेब्रुवारीपासून राज्यात उष्णतेच्या लाटांची तीव्रता सातत्याने वाढत आहे. औद्योगिक उत्पादनासोबतच कृषिपंपाचाही वीजवापर वाढला आहे. त्यामुळे राज्यात २८ हजार मेगावॉटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी सध्या कायम आहे. मुंबईवगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल चार हजार मेगावॉटने वाढ झालेली आहे. गेल्या पंधरवड्यापासून महावितरणची विजेची मागणी तब्बल २४, ५०० ते २४, ८०० मेगावॉटवर पोहोचली आहे.

वीज संकट तीव्र

विजेच्या मागणीचा चढता आलेख लक्षात घेता ही मागणी २५,५०० मेगावॉटवर जाण्याची शक्यता आहे. सध्या रात्रीच्या वेळातही २२, ५०० ते २३ हजार मेगावॉट विजेची मागणी आहे. महावितरणची स्थापित क्षमता ३३ हजार ७०० मेगावॉट असून त्यापैकी एकूण २१ हजार ५७ मेगावॉट (६२ टक्के) औष्णिक विद्युत क्षमता आहे. परंतु देशभरात कोळसा टंचाई असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या करारीत औष्णिक वीजनिर्मितीत देखील घट झालेली आहे. तसेच काही औष्णिक संच देखभाल व दुरुस्तीसाठी बंद असल्याने महावितरणला सध्या औष्णिक वीजनिर्मितीकडून तब्बल सहा हजार मेगावॉटने कमी वीज उपलब्ध होत आहे. वीजटंचाईमुळे शेजारच्या आंध्र प्रदेशमध्ये औद्योगिक ग्राहकांना ५० टक्के वीजकपात सुरु करण्यात आली आहे. तर गुजरातमध्येही औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येत आहे. तसेच इतर राज्यांमध्ये देखील शेतकऱ्यांसह अन्य ग्राहकांच्या वीजपुरवठ्यामध्ये कपात करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *