महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ एप्रिल । सिल्वर ओक येथील हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. हा पूर्वनियोजित कट असून, हल्ल्यापूर्वी एक विशेष बैठकही घेण्यात आल्याचे तपासात समोर आले. तसेच, जप्त केलेल्या मोबाईलमधून अनेक महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. याच माहितीमध्ये हल्ल्यापूर्वी शरद पवार यांना उद्देशून ‘सावधान शरद… सावधान शरद’, असे बॅनरदेखील करण्यात आल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात सांगितले.
पोलिसांनी न्यायालयात दिलेली माहिती
– हल्ल्याआधी एक बैठक झाली.
– बैठकीत सिल्व्हर ओक येथे हल्ला करण्याचे ठरले.
– अभिषेक पाटील नावाचा एस. टी. कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावले. त्यात यू ट्यूब चॅनलचे पत्रकारही होते. यात पाटीलसह चार जणांचा ताबा पाहिजे असून एक जण फरार आहे.
सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवाद
– एमजेटी मराठी न्यूज चॅनलचा चंद्रकांत सूर्यवंशी नावाचा पत्रकार सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने काही व्हिडिओ डिलीट केले आहेत. घटनेच्या दिवशीही सकाळी १०.३० वाजेपासूनच्या व्हाॅट्सअॅप चॅट मिळाल्या आहेत. तसेच, दोघांमध्ये व्हाॅट्सअॅप काॅल झाले.
– एक फोन नागपूर येथे करण्यात आला, संबंधित व्यक्तीचे नाव आता आम्ही कोर्टात सांगू शकत नाही.
– हल्ला व इतर प्रकारांमागे काही जण असून ते सहकार्य करत आहेत. त्यांना ६ महिन्यांपासून कुठून पैसे येत आहेत? त्याचाही तपास करायचा आहे. यामध्ये प्रत्येक एसटी कामगारांकडून एकूण ५३० रुपये, असे एकूण १ कोटी ८० लाख रुपये गोळा करण्यात आले आहे. या पैशांबाबतही तपास करायचा आहे.
– सदावर्ते यांचा एक फोन सापडलेला नाही. त्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी दडल्या आहेत. तो मोबाईल ३१ मार्च २०२२ पासून मिसिंग आहे. तो मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करायचे आहे. सदावर्ते हे नागपूरमध्ये कोणाच्या तरी सतत संपर्कात होते. घटनेच्या दिवशी सकाळी ११.३५ मिनिटांनी त्यांनी फोन केला.
– त्यानंतर, दुपारी १.३८ वाजता नागपूरच्या क्रमांकावरून आलेल्या संदेशात ‘पत्रकारांना पाठवा’, असे नमूद करण्यात आले होते. १२ एप्रिलला बारामतीत जायचे हा फक्त एक भ्रम तयार केला गेला होता. दुपारी पावणेतीनच्या सुमारास माध्यमांना कळवण्यात आले. यादरम्यान सदावर्ते मुद्दाम घटनेच्या वेळेस कोर्टात गेले होते.
– या प्रकरणी अभिषेक पाटील, कृष्णा कोरे, सविता पवार, मोहम्मद ताजुद्दीन मोहम्मद शेख यांनी पवार यांच्या बंगल्याची रेकी केली होती, तर एक जण फरार आहे. यामध्ये सच्चिदानंद पुरी यांचेही नाव समोर येत आहे. शेखने काही संदेश केले होते. ‘सावधान शरद…’ नावाचे बॅनर बनवले गेले होते. या बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो आहे. तसेच, आमदारांना १ लाख पेन्शन आणि कामगारांना १,६०० पेन्शन हा संदेशही व्हायरल केला गेला.
– त्यामुळे नागपूर कनेक्शनबरोबरच, रेकी करणाऱ्या आरोपींची सदावर्ते यांच्यासोबत समोरासमोर चौकशी करायची आहे. ते तपासाला सहकार्य करत नाही. त्यामुळे ११ दिवसांची वाढीव कोठडी द्यावी.