महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ एप्रिल । युक्रेनमध्ये हवाई वर्चस्व मिळविण्यासाठी रशियाने गेल्या आठवड्याभरात युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केल्याचा दावा केला आहे. रशियाने आता पूर्वेकडे नवी आघाडी उघडली आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या फौजांनी रशियाला चांगलेच प्रत्युत्तर दिले. युक्रेनच्या राजधानीसह इतर महत्त्वाची शहरे रशियाच्या ताब्यात जाण्यापासून युक्रेनने वाचवली. युक्रेनवर पूर्णपणे हवाई वर्चस्व प्रस्थापित करण्यात अपयश आल्याने जमिनीवर लढणाऱ्या रशियाच्या सैन्याला हवाई संरक्षण देण्यात रशियाला अडथळे आले. त्यांची आगेकूच मंदावली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल आइगर कोनाश्नकव्ह यांनी सांगितले, की रशियाने क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करून चार ‘एस-३००’ हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केल्या. रविवारी केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या २५ सैनिकांनाही टिपण्यात आले. युरोपकडून युक्रेनला हवाई संरक्षण यंत्रणा पुरविण्यात आली होती. गेल्या आठवड्यात स्लोव्हाकियाने सोव्हिएतनिर्मित एस-३०० यंत्रणा युक्रेनला पुरवली होती; मात्र रशियाने या यंत्रणा नष्ट केल्याचे कुठलेही पुरावे आपल्याकडे नसल्याचे स्लोव्हाकियाने सांगितले आहे. युक्रेनमध्ये रशियाचा भर हवेतून बॉम्बफेक करण्यावर राहिला आहे. युक्रेनमधील अनेक शहरे त्यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. रशियाची राजकीय आणि आर्थिक पातळीवरही कोंडी होत आहे. रशियाने युद्धगुन्हे केल्याचाही आरोप होत आहे.
रशिया आता पूर्वेकडे डोन्बास प्रांतात तुकड्यांची नव्याने जुळवाजुळव करीत आहे. रशियाच्या पाठिंब्याने तेथील बंडखोर २०१४पासून युक्रेनच्या फौजांशी लढत आहेत. दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झिल्येन्स्की यांनी पाश्चिमात्य देशांकडे आणखी मदत मागितली आहे.