महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ एप्रिल । सध्या युक्रेन-रशिया युद्ध (Ukraine Russia War) सुरूच आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त केली आहेत. युद्धग्रस्त राष्ट्राच्या पूर्वेकडील डोनबास या बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशासाठी लढाई सुरू झाली आहे. त्यानंतर रशियाने (Russia) युक्रेनियन युक्रेनच्या सैनिकांना तत्काळ शस्त्रे खाली टाकण्याचं आवाहन केलं आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. आमचे सैनिक मागे हटणार नाही, असं युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटलं होतं. आता रशियाने तत्काळ शस्त्र टाकण्यास सांगितलं आहे. त्यानंतर झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोव्हिच यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. डोनबासची लढाई काल सुरू झाली. आम्ही पूर्णपणे लढा देऊ. ही लढाई रशियाला जिंकता येणार नाही, असं ओलेक्सी म्हणाले. शक्य असेल तर राजनैतिक पातळीवर या युद्धाचा शेवट करण्यास युक्रेन तयार आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही शरणागती पत्करणार नाही, असं युक्रेनकडून ठामपणे सांगण्यात आलं.
रशियाने युक्रेनचं मारिउपोल शहर उद्ध्वस्त केलं आहे. मारिउपोलमधील अनेक नागरिकांनी मुलांसह अझोव्हत्सव पोलाद प्रकल्पात आश्रय घेतला आहे. रशियाकडून होणारा गोळीबार आणि रशियन सैनिकांच्या तावडीत सापडू नये, यासाठी ते तेथे लपले आहेत, अशी माहिती शहरातील पोलिस प्रमुख मिखाईल व्हर्शिनिन यांनी दिली. मारिउपोलमधील परिस्थिती गंभीर व हृदयद्रावक आहे. रशियाकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्यांनी सर्व सीमा पार केल्यास वाटाघाटीतून शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील. युक्रेनी फौजा सर्व ताकदीनिशी प्रत्युत्तर देत आहेत, मात्र प्रचंड विनाशामुळे मारिउपोल आता पूर्वीप्रमाणे उभे राहू शकणार नाही.