महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नवी दिल्ली : करोना फैलाव रोखण्याच्या दृष्टीने मोदी सरकारकडून लावण्यात आलेलं २१ दिवसांचं देशव्यापी लॉकडाऊन येत्या १४ एप्रिल रोजी संपणार आहे. आता मात्र, १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर काय याचा पेचही मोदी सरकारसमोर आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर करता येतील अशा सगळ्या कामांची चाचपणी येत्या ८ दिवसांत करण्याचे आदेश सगळ्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत. यासाठी आपल्या घरीच पेपरवर्क तयार करण्याचंही मंत्र्यांना सूचवण्यात आलं आहे. यासहीत एकाच वेळी गर्दी टाळण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करू शकतील, असं रोस्टर तयार करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. यासाठी ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचाही मार्ग सूचवण्यात आलाय.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊन लागू करणं जितकं कठीण होतं तितकंच त्यातून बाहेर येणंही कठीण आहे. परंतु, कामकाज सुरू होणं गरजेचं तर आहेच. त्यामुळे एका बैठकीत लॉकडाऊनच्या संकटातून बाहेर कसं पडावं? याबद्दल अनेक पर्यायांचा विचार करण्यात आला. त्यामुळे, तब्बल २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर कामकाज हळूहळू का होईना, पण सुरू केलं जाऊ शकेल.
अर्थव्यवस्थेला सुरळीत सुरू करणं, हेच सध्या सर्वात मोठं आव्हान आहे. अशा वेळी या कामांद्वारे कोविड १९ चा फैलाव नसणाऱ्या भागांमध्ये ही कामं सुरू करता येऊ शकतील. त्यामुळे रोजगार निर्माण होऊन गरिबांच्या हातात काही पैसे येऊ शकतील, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या कामांना सुरू करण्याची सरकार तयारी करत आहे. सध्या, लॉकडाऊनच्या काळातही शेतीकामांना सूट मिळालेली आहे.