महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२० एप्रिल । गुढीपाडवा मेळावा आणि ठाण्यातील राज ठाकरे यांच्या भाषणानंतर शरद पवार यांना तातडीने पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावे लागले. याचा अर्थ शरद पवार (Sharad Pawar) हे राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे, असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केले. ते गुरुवारी डोंबिवलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बाळा नांदगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर करण्यात येणाऱ्या टीकेसंदर्भात भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी प्रतिक्रिया देणे आणि पवार साहेबांनी प्रतिक्रिया देणे, यामध्ये फरक आहे. पवारसाहेब अशी कोणालाही प्रतिक्रिया देत नाहीत. मनसेचे इंजिन वेगाने धावू लागले आहे, ही बाब शरद पवार यांच्या ध्यानात आली आहे. त्यामुळेच शरद पवार हे राज ठाकरे आणि मनसेची इतकी दखल घेऊ लागले आहेत. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी येत्या ३ मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे सरकारने हटवावेत, असा अल्टिमेटम दिला होता. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याकडे असा अल्टिमेटम देण्याची ताकद नसल्याचे म्हटले होते. महाराष्ट्रात अल्टिमेटम देण्याची ताकद आणि कुवत ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर बाळा नांदगावकर यांनी प्रुत्यत्तर दिले. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अंगाखांद्यावर खेळले आहेत. त्यांच्या तालमीत तयार झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे बरेच गुण राज ठाकरे यांच्यामध्ये आहेत. त्यामुळे अल्टिमेटम देण्याचा गुणही बाळासाहेबांकडून राज ठाकरे यांच्याकडे आला आहे, असे नांदगावकर यांनी म्हटले.