महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पाऊस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२१ एप्रिल । मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक प्रदेशात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील काही प्रदेशात यामुळे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, आता भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्याना सर्कतेचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्‍ये पुढील तीन ते चार तासांमध्‍ये विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय हवामान खात्यानं यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्‍ये पुढील तीन ते चार तासांत विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे. तसेच 30-40 किमी प्रतितास वेगाने हे वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रदेशात काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान खात्याने केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21 ते 24 एप्रिल दरम्यान तुरळक पण विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. वातावरणातील बदलांमुळे आणि वादळी वाऱ्याच्या इशाऱ्याने कोकणतील आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. या कालावधीत नागरिकांनी बाहेर जाण्यासाठी प्रशासनाने खबरदारी बाळगण्याचे आवाहनही केलं आहे. मात्र आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी पावसाच्या बातमीने नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *