महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२१ एप्रिल । राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. मशिदींवरच्या भोंग्यांसंदर्भातलं राज ठाकरे यांचं वक्तव्य, त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या आलेल्या टीकाटिपण्ण्या, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेली बहुचर्चित उत्तरसभा यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चर्चेत येणार असल्याची चिन्हं आहेत.
मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक ट्विट केलं आहे. हे ट्विट मनसेच्या पत्रकार परिषदेसंदर्भातलं आहे. आपल्या ट्विटमध्ये खोपकर म्हणतात, आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत मोठी घोषणा… मोठ्ठा आवाज होणार आहे!
आता ही घोषणा काय असेल की पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत मुस्लीमविरोधी भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे भाजपा-मनसे युतीच्या चर्चाही राज्यातल्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
आज सकाळी ११ वाजता
पत्रकार परिषदेत मोठी घोषणा…
मोठ्ठा ‘आवाज’ होणार आहे!— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 21, 2022
मशिदींवरचे भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटममुळेही मनसेच्या पुढच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत काय होणार? मनसे कोणती मोठी घोषणा करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.