महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल । कोळसा टंचाई, उन्हाळय़ामुळे वाढलेली विजेची मागणी अशा परिस्थितीत करारानुसार वीजपुरवठा न करणाऱया कंपन्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कडक शब्दांत समज दिली. करारानुसार वीजपुरवठा करा नाहीतर करार रद्द केला जाईल, असे त्यांनी अदानी, जिंदाल वीज उत्पादक कंपन्यांच्या अधिकाऱयांना बजावले. त्यानंतर या कंपन्या ताळय़ावर आल्या असून करारानुसार वीजपुरवठा करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
राज्यातील वीजपुरवठय़ाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत वीज उत्पादक कंपन्यांकडून ठरलेल्या करारानुसार वीजपुरवठा करण्यात येत नसल्याची बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आली. याबबत गांभीर्याने दखल घेत ऊर्जामंत्री नितीन राऊत, संबंधित वीज कंपन्यांचे अधिकारी, सरकारी कंपन्यांचे अधिकारी यांची आज दुपारी ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱयांना कोणत्याही दबावाखाली न येता राज्याचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार उद्यापर्यंत अदानी कंपनीने ठरलेल्या करारानुसार 1300 मेगावॅट तर जिंदालकडून 300 मेगावॅट वीज देण्याचे मान्य करण्यात आले.
या बैठकीचा तत्काळ परिणाम राज्याच्या वीजपुरवठय़ावर झाला व नागरिकांना दिलासा मिळाला. अदानी पॉवर कंपनीकडून 1700 मेगावॅटवरून 2250 मेगावॅट वीज पुरवठा तत्काळ वाढविण्यात आला. उद्या सकाळपर्यंत हा पुरवठा 3100 मेगावॅटपर्यंत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महावितरणला महानिर्मितीकडून 6800 मेगावॅटपर्यंत वीज मिळत होती ती 7500 मेगावॅटपर्यंत मिळणार आहे.