महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल । भारतासह अनेक देशांना पाम तेलाची निर्यात करणाऱ्या इंडोनेशियात पाम तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. दोन-दोन किमीपर्यंत तेल खरेदीसाठी तेथे रांगा लागत आहेत. इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी शुक्रवारी पाम तेलाची निर्यात १००% बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय बाजारातील अनेक मोठ्या कंपन्यांनी तेलसाठा विक्रीला काढणे थांबवले. या पार्श्वभूमीवर भारतात खाद्यतेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत भारतात लिटरमागे दर एक ते दोन रुपयांनी वाढले. एकूण मागणीच्या ६८% तेल भारत आयात करताे. यात इंडोनेशिया व मलेशिया या दोन देशांतून पाम तेल तर युक्रेन आणि रशिया, अर्जेंटिना येथून सूर्यफूल तेलाची आयात होते.
अशी आहे भारताची खाद्यतेल आयातीची स्थिती
भारताची एकूण खाद्यतेलाची मागणी २३० लाख टन (वार्षिक)
भारत दरवर्षी आयात करताे खाद्यतेल १५० लाख टन
मलेशिया, इंडोनेशियातून आयात होते पाम तेल९० लाख टन
रशिया, युक्रेनमधुन होणारी सूर्यफूल तेलाची आयात ६० लाख टन
शंकर ठक्कर, अध्यक्ष, राष्ट्रीय खाद्यतेल व्यापारी महासंघ
या देशातून अशी होते आयात
सूर्यफूल तेल – युक्रेन ७० टक्के, रशिया २० टक्के तर अर्जेंटिना १० टक्के
पाम तेल – इंडोनेशिया ६५ टक्के तर मलेशियातून ३५ टक्के
मलेशियाचा पर्याय, पण पुरेसा नाही; दुसरा पर्याय काय असू शकताे?
पाम तेलासाठी आपण शंभर टक्के इंडोनेशिया, मलेशिया या देशांवर अवलंबून आहोत. त्यातही इंडोनेशियाचा वाटा खूप मोठा म्हणजे ६५ टक्के आहे. ताे पूर्णपणे बंद झाल्याने पर्याय म्हणून मलेशियाकडे पाहिले जात आहे. मात्र तेथील व्यापारीही आता या गंभीर स्थितीची फायदा घेत दर वाढवतील. दुसरी बाब म्हणजे, मलेशियाची तेल निर्यातीची क्षमता खूप कमी असल्याने दरवाढ अटळ आहे.