महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ एप्रिल । मशिदींवरील भोग्यांवरुन राजकारण तापलेलं असताना राज्य सरकारने बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आज पार पडली. मात्र या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गैरहजर होते. बैठकीनंतर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यासंदर्भात राज्य सरकार काही निर्णय घेऊ शकत नाही असं स्पष्ट केलं. तसंच मनसेने बैठकीत आपण अल्टिमेटम दिल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं नसल्याची माहिती दिली. तर दुसरीकडे बैठकीत सहभागी झालेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मात्र आपण भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं.
“आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्हालाही कायदा सुव्यवस्था उत्तम राखायची आहे. कुठेही गालबोट लागता कामा नये ही आमची भूमिका आहे. राज ठाकरेंनी भूमिका मांडली तेव्हा सुप्रीम कोर्टाचाच दाखला दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे इतर धर्मीयांना मिळत आहे तशी आम्हाला परवानगी द्यावी,” असं बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.
यावेळी बाळा नांदगावकर यांनी अल्टिमेटम कायम असल्याचं स्पष्ट केलं. “राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिला आहे. आता राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकसंबंधी नियम सांगितले आहेत. वर्षभर लोकांना परवानगी देणार असं होत नाही,” असं ते म्हणाले.
गृहमंत्री काय म्हणाले –
“भूमिकेवर ठाम आहोत अशी भूमिका कोणीही बैठकीत मांडली नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भोंगे वापरायला परवानगी आहे. रात्री १० ते सकाळी ६ याच वेळात वापरण्यावर बंदी आहे,” अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.