महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल । भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) हे पंजाब किंग्जच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजावर जाम खूष आहेत. त्यांनी भविष्यवाणीच करून टाकली की हा डावखुरा वेगवान गोलंदाज लवकरच भारतीय टी 20 संघात (Indian T20 Team) दिसेल. या गोलंदाजाने गेल्या तीन आयपीएल हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. रवी शास्त्री पंजाब किंग्जचा (Punjab Kings) डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) बद्दल बोलत आहेत. अर्शदीपने आयपीएलच्या 2019 च्या हंगामात पदार्पण केले होते. तो सध्या आयपीएलचा चौथा हंगाम खेळत आहे. पंजाबने त्याला मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन केले होते. पंजाबने फक्त दोन खेळाडू रिटेन केले होते. त्यातील एक अनकॅप्ट अर्शदीप सिंग होता.
पंजाबचा हा 23 वर्षाचा वेगवान गोलंदाज नवीन चेंडूवरही प्रभावी मारा करतो आणि स्लॉग ओव्हरमध्येही धावा रोखण्याचे काम करतो. याबाबत रवी शास्त्री म्हणाले की, ‘एखादा एकमद तरूण खेळाडू वेळोवेळी आपली कामगिरी आणि योग्यता सिद्ध करून दाखवत आहे. दबावातही हा खेळाडू चांगली कामगिरी करतोय. अर्शदीप दबावाचा चांगल्या प्रकारे मुकाबला करत आहे. तो स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत आहे. तो वेगाने आपला स्तर उंचावत आहे. त्यामुळे तो लवकरच भारतीय संघात दिसेल.’
आयपीएलमध्ये अजून एका वेगावान गोलंदाजाने सर्वांना प्रभावित केले आहे. तो म्हणजे उमरान मलिक (Umran Malik), सनराईजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या वेगवान माऱ्याने सर्वांना प्रभावित केले. याचबरोबर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा तिलक वर्मा (Tilak Varma) देखील चांगली कामगिरी करत आहे. महान फलंदाज ब्रायन लाराने उमरान मलिकची तुलना वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्डशी केली.
तो म्हणाला की, ‘उमरान मलिक मला फिडेल एडवर्ड्स आठवण करून देतो. त्याच्याकडे भन्नाट वेग आहे. मला आशा आहे की तो एक दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल. आयपीएलमध्ये वेगवान मारा खेळण्याची सवय असलेले अनेक फलंदाज आहेत. त्यामुळे मला आशा आहे की मलिक आपल्या भात्यात अनेक अस्त्र सामील करेल. तो वेगाने गोष्टी शिकतोय त्याला शिकण्याची उर्मी आहे ही चांगली गोष्ट आहे. भारताकडे अशी गुणवत्ता असलेला वेगवान गोलंदाज असण खूप जबरदस्त आहे.’